पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेत आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्यात येत आहेत मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी ही रक्कम २१०० रुपये करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत, किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण २१०० घोषित करु असे वक्तव्य केले होते.
यावरुन राज्यातील महिलांना २१०० रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. विरोधकांनी देखील यावरुन सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. या पार्श्वभूमीवर आज तरी याबाबत घोषणा होईल अशी प्रतिक्षा राज्यभरातील महिलांनी केली होती. मात्र, आज अर्थसंकल्पात २१०० रुपयांच्या घोषणेबाबत बोलणं टाळलं आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै, २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. सन २०२५-२६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावर्षी जी तरतूद करण्यात आली, तेवढ्याच रकमेची तरतूद २०२५-२६ वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींना २१०० रुपये मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांचा प्रश्न विरोधकांनी अर्थसंकल्पादरम्यान उपस्थि केला. त्यावर अजित पवारांनी ‘जरा बजेट होऊ द्या’, असं म्हणत विरोधकांना गप्प केल्याचे पहायला मिळाले. तसेच अर्थसंकल्पाच्या शेवटीदेखील यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्व महिलांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आधी म्हणायचे मी काँग्रेसचा हिरो, आता धरली शिंदे सेनेची वाट; रवींद्र धंगेकर चौथ्यांदा पक्ष बदलणार
-शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या अंगावर ओतलं पेट्रोल अन्…
-पुण्यात शरद पवार गट आक्रमक; शहराध्यक्षांकडून आंदोलक कार्यकर्त्यांचं निलंबन, नेमका काय प्रकार?
-उषा काकडेंचा आत्महत्येचा प्रयत्न की फूड पॅायझनिंग? रुग्नालयाने दिली महत्वाची माहिती