पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये चुरस सुरु आहे. बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. याच पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट जोरदार तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पिंपरी चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार रोहित पवार यांच्यात कलगितुरा रंगला आहे. तटकरेंनी घरातच सर्व महत्त्वाची पदे दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. तर, रोहित यांना नैराश्य आल्याचा आरोप करत तथाकथित ‘युवा नेतृत्व’ म्हणत तटकरेंनी रोहित पवारांची खिल्ली उडविली आहे.
अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचीच सत्ता होती. मात्र २०१७ नंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर आझम पानसरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपची वाट धरली आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्धवस्त केला.
अजित पवार शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह कार्यकारिणीने अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आणि भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत आलेले आझम पानसरे यांनी शरद पवार यांना साथ देण्याची भूमिका घेतली.
शरद पवार गटामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून कोणी बडा नेता किंवा पदाधिकारी नसल्याने शहरात आजही अजित पवारांचीच ताकद जास्त आहे. अजित पवार यांच्यामुळेच शहराचा सर्वांगीण विकास झाल्याचा दावा केला जातो. महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे पवार यांचे स्वप्न आहे. त्याकरिता त्यांनी पुन्हा शहरात लक्ष घातले आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच शहराचा दौरा केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेतील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शरद पवार यांच्याकडून शहराची जबाबदारी असलेल्या आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर आता शरद पवार गटाकडून काय उत्तर मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी
-काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल
-शिरुरच्या जागेवरुन आढळराव पाटलांचा युटर्न; अजितदादांची मजबूत फिल्डींग
-लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक
-“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”