पुणे: विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलीय. सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडीकडून निवडणुकीची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. सत्ताधारी आमदारांकडून आपल्या मतदारसंघातील विकास कामांच्या भूमिपूजनांचा धडाका लावण्यात आलाय, या कार्यक्रमांमध्ये युतीतील इतर पक्षांना डावलले जात असल्याचं दिसून येत आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जुन्नर येथे झालेला वाद ताजा असतानाच, आता वडगाव शेरीमध्ये देखील नवीन वाद उफाळून आला आहे.
३०६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वडगाव शेरी मतदारसंघात पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो टाकण्यात आलेला नाही. याच मुद्यावरून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना चांगलच सुनावल आहे. महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे, अशी टीका मुळीक यांनी केलीय.
जगदीश मुळीक यांची पोस्ट नेमकी काय?
वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे !
वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत !
तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही.