पुणे : राज्यातील काही पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे पहायला मिळाले. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याने महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. अशातच आता महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने नवी खेळी खेळत मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या १६ जिल्ह्यांमध्ये संपर्क प्रमुखांची नियुक्ती करणार आहे. संपर्क प्रमुख भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता शिंदे आणि पवारांच्या पालकमंत्र्यांवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची करडी नजर असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नेमलेल्या पालकमंत्र्यांमध्ये २० भाजपचे आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या ९ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रिपदे देण्यात आलेली आहेत. शिंदे-पवारांचे १६ पालकमंत्री हे भाजपला वरचढ ठरत नाहीत ना हे पाहण्यासाठी संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच सरकारसोबत चांगला समन्वय राखण्याचं कामही संपर्क प्रमुख करणार आहेत. संपर्क प्रमुख नियुक्तीचा निर्णय भाजपने मित्रपक्षांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न म्हणून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
‘निवडणूक काळात देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यात संपर्क प्रमुख महत्त्वाची भूमिका बजावतील. जनता आणि सरकार यांच्यातला दुवा म्हणून ते काम करतील.प्रत्येक जिल्ह्यातील एका गावात जा आणि रात्रभर तिकडे मुक्काम करा, अशा सूचना मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे मंत्र्यांना स्थानिक समस्या समजतील. आदिवासी जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने हा उपक्रम राबवला जाईल,’ अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…अन् मंत्री संजय राठोडांना मिळाला दिलासा; तरुणीच्या मृत्यूची केस बंद!
-धक्कादायक! माजी खासदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
-Pune GBS: ‘त्या’ विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?
-दुचाकी चालकाला अरेरावी अन् मारण्याची धमकी? नेमकं काय घडलं, बागुलांनी स्पष्टचं सांगितलं
-पुण्यात ‘GBS’चं थैमान! २४ रुग्णांवर आयसीयूत उपचार, शहरात नेमकी रुग्णसंख्या किती?