पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे पोलिसांनी धडक कारवाया करत ३ हजार ७०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. यावरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे अभिनंदन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना बक्षीस स्वरुपात २५ लाख रुपये दिले आहेत.
“अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असून पुणे पोलिसांची ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे”, असा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले. पोलिसांच्या संबंधित पथकाला २५ लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले आहे. पुणे पोलिसांकडून कुरकुंभ, दिल्ली, सांगली येथे छापे टाकून मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. पुण्यात अमली पदार्थ तयार करून परदेशात पाठविण्यात येत असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे कौतुक करण्यासाठी शनिवारी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे उपस्थित होते.
“पुणे पोलिसांची ही कारवाई अलीकडच्या काळातील देशभरातील मोठी कारवाई मानली जात आहे. तब्बल तीन हजार ७०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील पोलिसांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अमली पदार्थ विक्री आणि तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही. ते काम अमली पदार्थ करतात. अमली पदार्थ सेवनामुळे तरुण पिढी उद्धस्त होते. अमली पदार्थ तस्करी आणि विक्री म्हणजे देशविरोधी गुन्हा आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळ, मुळीक की देवधर, माध्यमांच्या सर्व्हेत खासदारकीसाठी ‘हे’ नाव आघाडीवर
-पुण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज: तरुणाई नशेत टुल्ल; पिट्याभाईंच्या त्या व्हिडीओने राज्य हादरलं
-‘यंदाच्या निवडणुकीत ४० हजार मतांनी निवडणून येणार’; शहाजी बापू पाटलांचा विश्वास
-बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण