पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अशातच आता पिंपरी विधानसभेत मोठा ट्वीस्ट आला आहे. पिंपरी शहराला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून योगेश बहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने या जागेवर राष्ट्रवादीकडे राहणार असून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित असताना नवनियुक्त शहराध्यक्ष बहल यांच्या वक्तव्याने पिंपरीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
योगेश बहल यांनी अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. ‘आमदार बनसोडे हे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते. लोकांना भेटत नव्हते, अशी पक्षातीलच पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे’, असे योगेश बहल म्हणाले असून त्यांनी बनसोडे यांना उमेदवारी देण्याला अप्रत्यक्ष विरोध केला आहे. बहल यांनी पिंपरीमधून महायुतीचे कोण नेते इच्छुक आहेत त्यांची नावे सांगितली असून बनसोडेंवर निशाणा साधला आहे.
“कोणाला उमेदवारी दिली पाहिजे? याबाबत अजित पवार भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. येत्या २ दिवसांत उमेदवार ठरेल. याचा अर्थ अण्णा बनसोडेंना उमेदवारी द्यायची नाही किंवा नवीन उमेदवार द्यायचा नाही असाही नाही. कोणत्याही परिस्थितीत पिंपरीची जागा घालवली जाणार नाही. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. मूल्यमापन करून निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिली जाईल”, असं म्हणत बहल यांनी बनसोडेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केला आहे.
“आमदार बनसोडे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते रुग्णालयात होते. त्यामुळे बनसोडे भेटत नव्हते अशा तक्रारी आमच्या पक्षातील लोकांच्या होत्या. परंतु, आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. प्रभागातील काम करतात पण नगरसेवकांना विचारत नाहीत. नवीन चेहरा देण्याची लोकांची मागणी आहे. पिंपरीत राष्ट्रवादीचाच आमदार होईल. कोणीही नवीन आमदार आला तरी त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे”, असे म्हणत बहल यांनी बनसोडेंच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध केला आहे.
खासदार श्रीरंग बारणे हे देखील चांगल्या माणसाला उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. उमेदवार बदली करायचा असेल तर जितेंद्र ननावरेंना उमेदवारी द्या, असे मी झोकून काम करणार, अशी ग्वाही बारणेंनी दिली असल्याचे बहल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे आता पिंपरीमध्ये बनसोडेंच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी; रोज रात्री मद्यपींवर होणार कारवाई, आयुक्तांचे आदेश
-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; राहुल कलाटेंनी घेतली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट
-खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींसह चौघे ताब्यात; शहाजीबापू पाटील अडचणीत, नेमकं काय कनेक्शन?
-Pune: बागवे खरंच भाजपच्या वाटेवर आहेत? व्हिडीओ शेअर करत थेट सांगितलं…