बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार सामना रंगल्याचा आपण सर्वांनी पाहिला. शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५३ हजार ९६० मताधिक्य घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवारांवर नामुश्की ओढवली आहे. बारामतीतील पराभवानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अजित पवारांनी बारामतीच्या पराभवाबाबत स्पष्ट मत मांडले आहे.
“चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेले वक्तव्य लोकांना आवडले नाही. तेही बारामतीत येऊन, मी याआधी देखील यावर बोललो होतो. तसेच बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे. कुठे कमी पडलो हे लोकांशी बोलल्यावरच कळेल. विधानसभा निवडणुकीत त्या चुका टाळू. तसेच मुस्लिम समाज आमच्यापासून दूर झाला. संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार केला त्याला मागासवर्गीय घटकाने पाठिंबा दिला”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण संपवायचे असल्याचे वक्तव्य भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचे बारामती मतदारसंघात चांगलेच पडसाद उमटले असून त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, बारामतीच्या पराभवानंतर देखील अजित दादांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे.
“बारामतीचा निकालाबद्दल आश्चर्य वाटते. बारामतीकरांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. मात्र यावेळी त्यांनी मला पाठिंबा कसा दिला नाही, माहिती नाही. लोकशाहीत जनमताचा कौल स्वीकारायचा असतो. आगामी विधानसभा निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील प्रमुख आहे त्यांच्याशी चर्चा करु, लोकसभा जागावाटपात त्रुटी राहिल्या. आम्ही कमी पडलो, म्हणून हरलो”, असे अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शुभेच्छा लोकसभेच्या अन् तयारी विधानसभेची, पर्वतीत भिमालेंनी ‘टायमिंग’ साधला
-प्रतिक्षा संपणार! येत्या ५ दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाचा इशारा
-काका अजित पवारांपुढे पुतण्या दंड थोपटणार, बारामतीत मोर्चेबांधणीला सुरुवात? युगेंद्र पवार म्हणाले…
-रासनेंनी चॅलेंज पूर्ण केलं.. धंगेकरांचा कसब्यातच करेक्ट कार्यक्रम! नेमकं काय घडलं?