पुणे : ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ हे अभियान नुकतेच राज्यात राबवण्यात आले. यामध्ये खाजगी शाळांमध्ये बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या शाळेने तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. या अभियानामध्ये राज्यातील १ लाख ३ हजारपेक्षा अधिक शाळांनी भाग घेतला होता. राज्यातील १ कोटी ९९ लाख विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राज्यभर राबवण्यात आले होते. त्याचे मूल्यांकन समितीने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मूल्यांकन केले आणि ८ विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे शाळा निवडण्यात आल्या होत्या. यामध्ये सरकारी आणि खाजगी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. खाजगी शाळांमध्ये राज्यात ‘शारदाबाई पवार विद्यानिकेतन’ शाळेने दुसरा क्रमांक मिळवला. येत्या ५ मार्चला मुंबई येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे.
या अभियानामध्ये शाळेने केलेली वीजबचत आर्थिक साक्षरता डिजिटल उपकरणांचा वापर लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबींचे मूल्यांकन करण्यात आले. ‘प्रधानमंत्री पोषण अभियान’ अंतर्गत ‘परसबाग’ अन्नाची योग्य रीतीने विल्हेवाट व व्यवस्थापन तसेच शाळेतील मूल्य संस्कार, वृक्ष संवर्धन, वडीलधाऱ्यांचा सन्मान अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. या सर्व बाबींमध्ये हजारो शाळांच्या मूल्यांकनात शारदानगरच्या या शाळेने बाजी मारली आहे.
एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांच्यासह सर्व विश्वस्त, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेचे समनव्ययक प्रशांत तनपुरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांचे सर्व सहकारी यांचे मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. तर वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच शाळेने हा नावलौकिक मिळवल्याची कृतज्ञता मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात “होय हे आम्ही केलं”चा पॅटर्न; निवडणूक लोकसभेची पण कसब्यात चर्चा ‘पोस्टर वॉर’ची
-“राष्ट्रवादीत फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
-“अमोल कोल्हे फिल्मी डायलॉगबाजी करणारे खासदार! धाकल्या धन्याचं नाव घेवून पैसे कमावतात”