पुणे : राज्यात सर्वात चर्चेचा मतदारसंघ असणाऱ्या बारामतीमध्ये दररोज राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘शरद पवारांना राजकारणातून बारामतीमधून संपवण्यासाठी आम्ही आलो आहोत’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावरुन आता बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
‘मंत्री चंद्रकांत पाटील बारामती मध्ये येऊन म्हणतात की, आम्ही बारामती मधून शरद पवारांना संपविण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे ही संपविण्याची भाषा आमच्याकडे नाही. आम्ही दडपशाही नाही तर लोकशाही माननारे आहे. लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही राजकारण करत नाही तर सामान्य नागरिकांचे आयुष्यात चांगला बदल घडविण्यासाठी राजकारण करत आहे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मी मगील ३ महिन्यापासून सांगत आहे की, बारामती आणि पुणे जिल्ह्यात अनेक भागात पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. प्रशासनाने आम्ही उपाय करु सांगितले परंतु काही केले नाही. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार काही प्रयत्नशील नाही. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची जे सत्ताधारी आहे त्यांनी वेळोवेळी फसवणूक केली आहे.
अनेक वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी सदर समाजाचे घेऊन आश्वासने दिली परंतु पुर्तता कोणतीही केली नाही. दुष्काळ, आरक्षण, बेरोजगारी, महागाईबाबत सरकार असंवेदनशील आहे. निवडणूक आल्याचे कारण देत पळवाट काढत आहे. भाजप केवळ निवडणूक लढणे, पक्ष फोडणे, घर फोडणे, ईडी, सीबीआय आयकर विभागाच्या मदतीने छापेमारी करणे यातच गुंतलेलं आहे. प्रशासनाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या नाकर्तेपणा आणि पक्ष फोडीवरुन भाजपला धारेवर धरलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे” -मुरलीधर मोहोळ