पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली आहे. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत.
पुढील काही काळातच लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण सध्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्याबरोबर सत्तेमध्ये एकत्रित आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा आपल्या हक्काचा आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी भरगच्च असलेला मतदारसंघ आहे. अजित पवारांनी देखील यापूर्वी काही काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह, अजितदादा पवार व कुटुंबाप्रती असलेले प्रेम, जनसामान्यांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा असलेला दांडगा संपर्क यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय सोयीस्कर राहणार असल्याचं वीरधवल जगदाळे पत्रामध्ये म्हणाले आहेत.
माझी आपणास नम्र विनंती आहे की या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा देखील दांडगा जनसंपर्क आहे. या मतदारसंघाची उमेदवारी सुनेत्रा यांना मिळावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे तसे झाल्यास कार्यकर्त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे.
आपण सध्या राज्यात आणि केंद्रात देखील सत्तेत आहोत या गोष्टीचा फायदा या भागातील विकासासाठी होणार आहे. तरी आम्हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावतीने आपणास नम्र विनंती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा आपण प्रामुख्याने विचार करावा, अशी विनंतीदेखील त्यांनी या पात्रातून केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“ज्याने माझं नाव फोडलं त्याला मीच महापौर केलं होतं”; अजित पवारांचे प्रशांत जगताप यांना खडेबोल
-राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गटाचा युवक मेळावा; काय असणार पुढील रणनिती?
-‘गुंडाने गुंडाचा काटा काढला हे खरं आहे की नाही? मोहोळ हत्याकाडांवर अजितदादांचं वक्तव्य