इंदापूर : राज्यातील सर्वात चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय ‘सोनाई’ प्रमुख दशरथ माने यांनी इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली असल्याचं समोर आलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला असून अनेक तर्कवितर्क लाावले जात आहेत.
गेल्या काही दिवसापर्यंत दशरथ माने यांचे पुत्र प्रवीण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसले होते. मात्र, फडणवीस इंदापुरात आल्यानंतर थेट माने कुटुंबीयांच्या घरी गेले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रवीण माने यांच्या घरी गेले त्या ठिकाणी शिरूरचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल देखील उपस्थित होते. यावरुन सुरु असलेल्या चर्चेवर आता मंगलदास बांदल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“माने हे जिल्हापरिषदेचे नेते आहेत. त्यांच्या भेटीला मी आलो तेव्हा फडणवीसदेखील होते. मी फडणवीसांना भेटण्यासाठी आलो नाही. हा योगायोग होता. मी स्वत: शिरुर लोकसभा मतदार संघाचा वंचितचा उमेदवार आहे. त्यामुळे फडणवीसांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. बारामतीत वंचितने शरद पवारांना पाठिंबा दिला आहे आणि मी शिरुरमधून उमेदवार आहे. त्यामुळे फडणवीसांची भेट घेण्याचा कोणताही उद्देश नाही”, असे स्पष्टीकरण मंगलदास बांदल यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवस उष्णतेत वाढीची शक्यता; रात्री उकाड्यातही वाढ!
-भोसरीत आढळराव पाटलांची ताकद वाढली! विलास लांडे लागले प्रचाराला; नेमकं गणित जुळलं कसं?
-मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपची फिल्डिंग! पक्षाचे १० हजार कार्यकर्ते पोहचणार १२ लाख नागरिकांपर्यंत
-‘फडणवीस साहेब, इथं खरंच खूप त्रास होतोय’; अंकिता पाटलांनी फडणवीसांसमोर वाचला तक्रारींचा पाढा