पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतलं आहे. ‘आताच्या खासदार आहेत त्यांनी केलेल्या कामाचं परिपत्रक काढलं आहे. पण त्यामध्ये ९० टक्के कामं तर मीच केली आहेत’, असा दावा करत अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला लगावला आहे.
“याआधी फॉर्म भरल्यानंतर फक्त शेवटची सभा बारामतीत व्हायची, आता का फिरावं लागतं आहे? आता हे का करावं लागतं आहे? प्रशासनावर माझी पकड नाही का? मी फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जातोय. हा विकासाचा रथ पुढे घेऊन जायचं असेल तर भावनिक होऊ नका. घड्याळाशिवाय पर्याय नाही”, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना सुनावलं आहे.
“मी आजही तोलून मापून बोलतो आहे. जर मी तोंड उघडलं तर यांना फिरता येणार नाही. काही जण म्हणतात त्यांना धमकावले जात आहे. मी कशाला धमकावू? आज अनेक जण म्हणतात, मी पक्ष चोरला. आज ८० टक्के आमदार माझ्यासोबत आहेत. तुम्ही म्हणाल ते बरोबर कसे? मी कुणालाही अडचणीत आणणार नाही. पण कामे करण्याची ताकद कुणाकडे आहे? अजून १० वर्ष काम कोण करू शकतं? बारामतीत काय करायचं हे तुम्ही ठरवा. बाकी ५ विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार आघाडीवर असेल.”
“जे तुम्ही सांगितले ते मी आजपर्यंत केलं. काही लोकांचं काम मला कळत नाही. आताच्या खासदारांनी पत्रक काढले, पण त्यातील 90 टक्के कामं मीच केलेली आहेत. पोलीस उपमुख्यालाय, नगरपालिका, पोलीस ठाणे, पंचायत समिती, रस्ते ही कामं मीच केली. मी कऱ्हा नदीवरचे सगळे बंधारे नवीन करायला सांगितले आहेत. नाझरे धरणात पाणी आणण्याचा प्लॅन माझ्या डोक्यात आहे. केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता. आपला उमेदवार निवडून आला तर माझी ही कामे करा असे मी मोदींना सांगेन.”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांच्या नळाला कोरड; महापालिकेकडे ४ दिवसांत ४०० तक्रारी
-जान्हवी कपूरचा सुशिलकुमार शिंदेंच्या मुलीसोबत व्हिडीओ व्हायरल; सिद्धिविनायक मंदिरात पोहचली अनवानी
-‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी
-अजित पवारांकडून दुभंगलेली मनं जोडण्याचा प्रयत्न; ‘जनसंवाद सभे’चे आयोजन