पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे काही जागांवरील उमेदवार निश्चितीसाठी वरिष्ठ पातळीवर बैठका, चर्चा सुरु आहेत. हळूहळू पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर केली जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झालेल्या जागांवर बंडखोरी पहायला मिळत आहे. पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू भेगडे यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बापू भेगडेंनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.
अनेक जागांप्रमाणे मावळच्या जागेवर देखील उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु होती. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर झाली. यामध्ये विद्यमान आमदार सुनील शेळकेंना पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असणारे बापू भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनेपासून सदस्य आहे. मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मी तयार झालो. माझं कुटुंब एकनिष्ठ काम करत राहिलं आहे. परंतु, मला अजित पवारांनी मावळमधून उमेदवारी दिली नाही. विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मला खूप दुःख झालं आहे”, अशी खदखद बापू भेगडे यांनी व्यक्त केली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातून बापू भेगडे हे अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. त्यातच बापू भेगडे यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर मावळमधून महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या भाजपच्या माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
‘बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही विद्यमान आमदार सुनील शेळके यांचं काम करणार नाहीत, असा ठराव आजच्या बैठकीत झाला आहे. पक्षश्रेष्ठींचा फोन किंवा आदेश आल्यास आम्ही त्यांची माफी मागणार असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत”, असे बाळा भेगडे पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यामुळे आता आमदार सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत पाहायला मिळणार असून शेळकेंना याचा चांगलाच फटका बसणार असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Ambegaon: ‘वळसे पाटलांमुळे माझं जगणं कठीण झालंय’ उमेदवारी अर्ज भरण्याआधी आंबेगावात राजकीय राडा
-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरेना! इच्छुकांचा जीव टांगणीला
-बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; अजित दादांसमोर पुतण्याच थोपटणार दंड?
-दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील? इंदापूरात तिसऱ्यांदा होणार काँटे की टक्कर!
-राष्ट्रवादीने जाहीर केला हडपसरचा उमेदवार; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी? भानगिरे उद्या घेणार मेळावा