इंदापूर : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वच पक्षांना उत्सुकता लागली आहे. आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभेच्या निकालापूर्वीच अनेक भागांमध्ये उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागल्याचे पहायला मिळते. इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे तर फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत.
संपूर्ण राज्यात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत झाली ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची. इंदापूरमध्ये तसेच परिसरात कालपासून निकालाच्या ३ दिवस आधीच सुप्रिया सुळें यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. इंदापूर शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत. या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे तर त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली. एकाच कुटुंबातील दोन्ही सदस्यांनी एकमेकांविरोधात उभे राहून ही निवडणूक लढली आहे. त्यातच आता जनतेने कोणाला कौल दिला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणारे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत झाली. फलटणमध्ये मात्र, निंबाळकर यांच्या अभिनंदनाचे फलक ठिकठिकाणी झळकले आहेत. भाजप युवा मोर्चाचे शंभूराजे भोसले यांनी फलटण शहरात ठिकठिकाणी असे बॅनर लावल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. ४ जूनच्या निकालातून कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईलच मात्र त्यापूर्वीच उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लावण्यास सुरवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Skin Care Tips | मलायका सारखी सुंदर स्कीन हवीय, तर मग आजच बनवा ‘हे’ सोपे फेसपॅक
-आरोपीची आई शिवानी अग्रवालकडूनही उडवाउडवीची उत्तरं; उद्या न्यायालयात करणार हजर
-‘येत्या ७ दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा…’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा