पुणे: ज्येष्ठ नृत्यगुरू पं .मनीषा साठे यांच्या ‘मनीषा नृत्यालय’संस्थेतर्फे ‘कथक नृत्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार,दि.२२ डिसेंबर रोजी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते.’मनीषा नृत्यालय’च्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या बहारदार नृत्य सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
मनीषा साठे तसेच त्यांच्या १५० शिष्यांच्या वैविध्यपूर्ण नृत्य रचनांचे विलोभनीय सादरीकरण झाले. मनीषा साठे यांनी शिवस्तुती, पारंपारिक ताल, बनारस घराण्याच्या रचना आणि चक्री प्रस्तुत केल्या आणि उपस्थितांची वाहवा मिळविली.आजच्या सादरीकरणाचे नृत्त, अभिनय हे दोन्ही भाग संस्मरणीय ठरले . चतरंग ,तराणा, सरगम, कवित्त माला हेही सादर करण्यात आले. लोकनृत्य देखील सादर करण्यात आली.सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.
ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननावरे, सरपंच विनायक गायकवाड या पालकांचा त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला .श्रीमती प्रतिभा शाहू मोडक, रवींद्र दुर्वे, लीलाताई गांधी, रजनी भट, जयमाला इनामदार, सुहासिनी देशपांडे,डॉ. शारंगधर साठे, क्षमा वैद्य हे मान्यवर उपस्थित होते.