पुणे : गणेशोत्सव पार पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा झाल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पुणे शहरातील आठ मतदारसंघातील कोणती जागा कोणत्या पक्षाकडे जाणार? यावर सद्या वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून शहरातील तीन मतदारसंघावर जोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील हेच मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोथरूड, खडकवासला आणि वडगाव शेरी मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला हवा आहे. यामध्ये कोथरूडची जागा शिवसेनेला जाणार हे जवळपास निश्चित आहे. तर वडगाव शेरी आणि खडकवासल्यात देखील ठाकरेंचे शिलेदार कामाला लागले आहेत.
वडगाव शेरी मतदारसंघाचा विचार केल्यास विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे अजित पवारांसोबत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याने हा मतदारसंघ मिळवण्यासाठी ठाकरेसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वडगाव शेरीतील स्थानिक राजकीय गणिताचा विचार केल्यास तुतारीकडून लढण्यासाठी बाहेरून उमेदवार आयात करावा लागू शकतो, तर ठाकरे सेनेकडे मात्र इथं प्रबळ दावेदारांची मोठी यादी आहे.
महत्वाचे म्हणजे कधीकाळी याच भागातून शिवसेनेचे आठ ते दहा नगरसेवक पुणे महापालिकेवर विजयी झाले होते. यामुळेच संघटनात्मक विचार केल्यास ठाकरे सेनेकडे नेत्यांची मोठी गर्दी आहे. उलट पक्षी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांकडे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच येथे शिलेदारांची संख्या आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळायला हवा, असा आग्रह ठाकरेसेनेकडून केला जात आहे.
दुसऱ्या बाजूला खडकवासला मतदारसंघात सध्या भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. तर तुतारीकडून लढण्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले मा नगरसेवक वसंत मोरे हे देखील खडकवासल्यात लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र सद्या पाहायला मिळत आहे. आता जागा वाटप करताना पक्षश्रेष्ठी या सर्व मुद्द्यांचा विचार करणार का तसेच ठाकरे गटाला सन्मानाची वागणूक पुणे शहरात मिळणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
-अजित पवारांकडून निवडणूक आयोगाचा नियम भंग; इव्हिएम रथाला हिरवा झेंडा दाखवला?
-‘राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर…’; पुण्यात शिवसेना आक्रमक, नेमका काय प्रकार?
-पुण्यात विधानसभेचे मतदारसंघ ८ अन् महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५; कसं असणार जागावाटप?
-पुण्यात विधानसभेच्या ८ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५