पुणे : विधानसभा निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून जागा वाटपावर सध्या चर्चेच्या फैरी झडत आहेत. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी ३ मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केल्याने डोकेदुखी वाढणार आहे. पक्षातील इच्छुकांकडून वरिष्ठ नेत्यांच्या समोर उमेदवारीसाठी दावा केला जात असतानाच आपला विचार न झाल्यास वेगळी भूमिका घेण्याचा इशारा दिला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळतेय.
वडगाव शेरी
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मागील आठवड्यात वडगाव शेरीमध्ये बैठक पार पडली. यावेळी हा मतदारसंघ भाजपलाच मिळायला हवा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपले काम केले नाही. ही जागा राष्ट्रवादीला सुटलास आपण काम करणार नसल्याचा थेट इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे वडगाव शेरीतून लढण्यासाठी आग्रही आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार असल्याने युतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे भाजपमध्ये देखील मुळीक यांच्यासह माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक बॉबी टिंगरे हे देखील इच्छुक आहेत. मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता असल्याने बापूसाहेब पठारे यांनी थेट तुतारी हातात घेण्याचा इशारा दिलाय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायट्यांमध्ये भेटी देत असताना पठारे यांनी आपण तुतारीवर लढणार असल्याचं बोलून दाखवलं. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून देखील मतदार संघावर दावा केला जातोय.
हडपसर
हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. भाजपकडून येथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर आमदार करत त्यांचा विषय मार्गी लावण्यात आलाय. मात्र शिवसेनेचे शहराध्यक्ष असणारे प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे आपल्याला उमेदवारी मिळायला हवी यासाठी आग्रही आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भानगिरे यांनी मतदारसंघ धुंडाळून काढला आहे. आमदार चेतन तुपे यांच्यापुढे भानगिरे यांनी महायुतीत उमेदवारीसाठी आव्हान उभे केलं आहे.
खडकवासला
खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. हॅट्रिक आमदार म्हणून त्यांची ओळख असून यंदा मात्र भाजपमधूनच त्यांना आव्हान देण्याचं काम केलं जातंय. माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, माजी नगरसेवक हरिदास चरवड यांना खडकवासल्यातून आमदार व्हायचय, यासाठी त्यांनी भाजप श्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केल्याचं दिसत आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट पाटील यांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे २००९ पासून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. यंदा काही झालं तरी विधानसभा निवडणूक लढवायची असा नारा कोंडे यांच्याकडून दिला जात आहे. त्यामुळे खडकवासला मतदारसंघात देखील भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये खडाखडी होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांना आता शहरातील ध्वनीप्रदूषणाची पातळी पाहता येणार; शहरात लागणार डिजीटल बोर्ड
-पुणे गणेशोत्सव: शहरातील ‘हे’ मुख्य रस्ते आजपासून बंद; पर्यायी मार्ग कोणते?
-मद्यधुंद नशेत चालकाने मनसे पदाधिकारी, त्यांच्या पत्नीच्या अंगावर घातला टेम्पो अन्…
-वनराज आंदेकर प्रकरणी मोठा ट्वीस्ट; ‘त्या’ आरोपीलाही ठोकल्या बेड्या