पुणे : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढली. आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी राजकीय रणनिती आखायला सुरवात केली. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबईतील ३६ जागांवर दावा केला आहे. तर पुण्यातील २१ मतदारसंघापैकी ८ मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेला पुण्यातील एकाही मतदारसंघात विजय मिळाला नव्हता. मात्र, आता राजकीय समीकरणं बदलल्यामुळे नव्या समीकरणाप्रमाणे महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना निश्चित आहे. यातच प्रत्येक जिल्ह्यात राजकीय समीकरण पाहता युतीच सगळ्यांनाच थोड्या अधिक जागा द्याव्याच लागणार आहेत. त्यानुसार आता ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडे पुणे जिल्ह्यात एकूण ८ मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
खडकवासला
महायुतीकडून खडकवासला मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीत शरद पवार गटाने आपला दावा सांगितला असतानाही उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात सभा घेतली. या सभेत वसंत मोरे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले असून खडकवासला जागेवर दावा केला आहे.
वडगाव शेरी
महायुतीमध्ये वडगाव शेरीची जागा अजित पवारांकडे आहे. महाविकास आघाडीकडून भाजपचे बापू पठारे हे शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर पठारे हे वडगाव शेरीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. याच मतदारसंघातून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि नितीन भुजबळ यांच्या नावाची सध्या जोरदार सुरू आहे.
हडपसर
महाविकास आघाडीत हडपसर मतदारसंघावर शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. हडपसरमधून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर ठाकरे गटाकडून माजी आमदार महादेव बाबर यांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या बैठका, लोकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.
चिंचवड
मागील एका दशकापासून विधानसभेची तयारी करत असलेले राहुल कलाटे चिंचवडमधून विधानसभेची तयारी करत आहेत. राहुल कलाटे यांनी २०१४ साली शिवसेनेच्या तिकीटावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा त्यावेळी भाजपच्या लक्ष्मण जगताप यांनी पराभव केला होता. २०१९ सालीदेखील त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु तेव्हाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशातच आता त्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
पिंपरी
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अॅड गौतम चाबुकस्वार यांनी तयारी सुरू केली आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात बाबा काळे विधानसभेसाठी इच्छूक आहेत. तर जुन्नरमध्ये कॉंग्रेसचे सत्यशील शेरकर यांना ठाकरे गटात प्रवेश करून त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. यातच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधून ठाकरे गटाकडून पृथ्वीराज सुतार आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे इच्छूक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘…तर तुरुंगातच टाकतो’; ‘लाडकी बहिण’वरुन अजित पवारांनी दिला सज्जड इशारा
-अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक; वाचा नेमकं कारण काय?
-विधानसभेसाठी अजित पवारांच्या २५ उमेदवारांची यादी जाहीर; बारामतीमधून कोण लढणार?
-‘अशा वृत्तींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही’; हिंदू देवतांचा अपमान केल्याने हेमंत रासने आक्रमक
-पुण्यात कट्टर राजकीय विरोधक येणार एका मंचावर; अजित पवार-सुरेश कलमाडी एकत्र येणार?