पुणे : पुणेकर मतदारांच्या मनात मतदानाविषयी कायम उदासीनता असल्यामुळे मतदानाची टक्केवारी नेहमीच कमी असते. शहरातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मतदारांना आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. पुणे नागरिक मंच, क्रेडाई, आर्ट ऑफ लिव्हिंग, पुणे हॉटेलर्स असोससिएशन, पुणे रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेलर्स असोसिएशन, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ या संस्थांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पुढाकार घेऊन पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी सर्व संघटनांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत.
पुणे नागरिक मंचाचे विशाल नलकरे म्हणाले की, “पुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून अलिकडच्या काळात शहरात मतदानाविषयी उदासीनता वाढत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहेत. आमच्या या अभियानात ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, हास्य क्लब आणि गृहनिर्माण संस्था देखील जोडल्या गेल्या आहेत.”
‘आम्ही २० नोव्हेंबरला मतदानाच्या तारखेला इंजिन ऑइल खरेदीवर ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देऊ’, असे पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले आहेत. तसेच लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य बजावलेल्या व्यक्तींना हॉटेलमध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे पुणे रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेलर्स असोसिएशनचे गणेश शेट्टी म्हणाले आहेत.
या सर्व संस्था- संघटनांतर्फे मतदानाच्या विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहेत. सोसायटी पातळीवर वॉररूम उभारण्यात येणार असून पोस्टर स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्सवात पुणेकर नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी सर्व संघटनांकडून करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांच्या ‘त्या’ प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनीच काढला तोडगा
-पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; शहरातील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ असतील पर्यायी मार्ग
-‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ नेते पक्ष संपवायला निघालेत’; आबा बागुलांचा गंभीर आरोप