पुणे : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. ही योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. योजना जाहीर होताच राज्यभरातील लाखो महिलांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी देखील केली आहे. याच योजनेवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर वारंवार टीका करत आहे. यामध्ये आता काँग्रेसकडून कॅगच्या रिपोर्टचा हवाला देत ही योजना बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सरकारने कर्ज काढून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविणे राज्याच्या हिताचे नाही. शिवाय ही योजनाच फसवी असल्याचे कॅगच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवणे एक चुनावी जुमला आहे. त्यामुळे ही योजना बरखास्त करुन राज्याच्या पायाभूत सुविधांवर लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा या योजनेविरोधात न्यायालयात जाणार असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास उर्फ आबा बागुल यांनी दिला आहे.
‘सरकारनामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘देशाचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी राज्य सरकारने अनावश्यक अनुदाने कमी करावीत, असे निरीक्षण नोंदविले आहे. त्याशिवाय राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो किंवा युवा प्रशिक्षण, रोजगार मेळावे यावर राज्याच्या तिजोरीतून भरमसाठ पैसा खर्च करणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आबा बागुल सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीकेची झोड; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘काहीही झालं तरी केंद्र बिंदू…’
-अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल; बारामती विधानसभा निवडणूक लढणार नसल्याच्या चर्चेला जोर
-शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवत दमदाटी करणं पडलं महागात; पुणे पोलिसांची मनोरमा खेडकरांना नोटीस