पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता सुरु झाली असून उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप-पत्यारोप, टीका-टिपण्णी करताना दिसत आहेत. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या सभेत अजित पवार भावनिक झाले. त्यांना कुटुंबाबाबत बोलताना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले. यावरुन मंगळवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची नक्कल केली. ही नक्कल अजित पवारांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना अजित पवारांनी शरद पवारांनी केलेल्या नक्कलीवर प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवारांना ज्या उंचीवर देश बघतो, महाराष्ट्र बघतो…त्या मोठ्या नेत्याने माझी नक्कल केलेली अनेकांना पटली नाही. मी रात्र-दिवस एक करुन, सगळीकडे जाऊन निवडणुकीत काम केलं. शरद पवारांनी मुलाप्रमाणे असणाऱ्याची नक्कल केली, हे अनेकांना आवडलेलं नाही. मी रुमाल काढला नव्हता, त्यांनी रुमाल काढला. मी आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो. कधी-कधी असं होतं. पण माझं रडणं नैसर्गिकपद्धतीने झालं. पण मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी माझी नक्कल केली, याचं खूप वाईट वाटलं”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“माझी नक्कल युगेंद्र पवार किंवा इतरांनी नक्कल केली असती तर चाललं असतं. पण शरद पवारांसारख्या प्रगल्भ नेत्याने अशी नक्कल करणं अनेकांना पटलं नाही. इतके दिवस मला वाटत होतं की फक्त राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेबही दिसले”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांना टोलाही लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
-“घर फोडण्याचं पाप माझ्या…”; अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार स्पष्टच बोलले
-फडणवीसांची भेट अन् मोहोळांची शिष्टाई! भिमालेंचे बंड शमले मिसाळांना दिलासा
-मेट्रोने प्रवास करत हेमंत रासनेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कसब्यात दिसली महायुतीची एकजूट
-भाजपचे मुळीक गेले उमेदवारी अर्ज भरायला, फडणवीसांचा फोन आला अन् मुळीकांनी घेतला यु-टर्न