पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात आचारसंहिताही लागू झाली तरी अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीचा काही जागांवरील जागावाटपाचा पेच मिटला नसल्याचे चित्र आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहचली तरीही यावर तोडगा निघाला नाही. त्यातच पुण्यातील चर्चेत असणाऱ्या खडकवासला मतदारसंघात मोठा ट्विस्ट आल्याचे पहायला मिळत आहे.
खडकवासल्यात भाजपचे विद्यमान आमदार असून हा मतदारसंघ भाजपकडे राहणार हे निश्चित असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) या मतदारसंघावर दावा केला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी अजित पवारांना पत्र दिले होते. तसेच खडकवासल्यातून यंदा उमेदवार बदलण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेते करत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी देखील दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी महापौर दत्तात्रय धनकवडेंनी दंड थोपटले असून हा मतदारसंघ आपल्याकडे घ्या, अशी मागणी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
‘मागील विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मी खडकवासला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. यंदा देखील खडकवासल्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अजित दादांनी घ्यावा मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. तशी माझी तयारी देखील सुरू आहे. विद्यमान आमदारांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नगरसेक गेल्याने हा मतदारसंघ जिंकणे त्यांना अवघड आहे त्यामुळे अजितदादांनी ही जागा आपल्याकडे घ्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे’, असे दत्तात्रय धनकवडे म्हणाले आहेत.
दत्तात्रय धनकवडेंनी दंड थोपटल्यामुळे आता महायुतीमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. खडकवासल्याची जागा अजित पवार गटाला सुटल्यास आपला दावा भक्कम व्हावा यासाठी या इच्छुकांकडून आता जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाकडे जाणार यावर एकमत झाले नसल्याने खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अदलाबदली होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसला जिंकायचाय पारंपारिक मतदारसंघ, पण अंतर्गत वादाचा होणार भाजपला फायदा?
-भावी अधिकाऱ्यांच्या स्वप्नांची राख; अभ्यासिकेला आग, विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले
-अजितदादांच्या शिलेदाराचा ठाकरे सेनेत प्रवेश; चिंचवड विधानसभेचं गणित बदलणार?
-कसब्यात काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा, महिला नेत्याचा लढण्याचा नारा; धंगेकरांना डोकेदुखी
-भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबनाची कारवाई! मावळमध्ये काय राजकीय राडा?