पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांचे आज मतदान पार पडले. बारामती मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली. या सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी आढळराव पाटलांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर चांगलाच निशाणा साधल्याचं पहायला मिळालं आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये उरुळी कांचन येथे महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरुरमधून कसे तिकिट दिले याबाबतचा किस्सा सांगितला. त्या बरोबर अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर कोल्हेंनी केलेल्या भूमिकांवरुन अजित पवारांनी धारेवर धरलं.
‘कलाकारांना जनतेच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नसतं. कोल्हे शिरुरमधून निवडून आल्यानंतर वर्षा दोन वर्षांनी माझ्याकडे आले, अन् मला म्हणाले, दादा हे मला नको बुआ…मला काही हे जमत नाही. मी कलावंत आहे, अभिनेता आहे. माझ्यावर व्यवसायिक परिणाम व्हायला लागलामला मालिकांमध्ये काम करायचं असतं शूटींगसाठी वेळ देता येत नाही. लोकांना वेळ देऊ शकत नाही. असे कोल्हे म्हणाले’, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
पुढे सांगताना अजित पवार म्हणाले की, “अहो त्यांनी तर एका चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची भूमिका केली. म्हणजे कहरच छत्रपती शिवाजी महाराज, नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि थेट नथुराम गोडसेच…यावर मी म्हणालो हे कसं काय तर मला ते म्हणाले आपण कलाकार आहोत, जी भूमिका देतील ती करणे, जे मानधन मिळेल ते स्विकारणे. काही कलाकार खराब गोष्टींची जाहिरात करायला तयार होत नाहीत. काही कलाकार पैसे दिले तर काहीही करतील, कोणाच्या वरातीत नाचतील, पंगतीत वाढायला लागतील”, असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मतदारांसाठी मोहोळांकडून प्रभावी यंत्रणा; पुणेकरांनी घेतल्या दोन लाख ‘व्होटिंग स्लीप’
-दत्तात्रय भरणेंची मतदान केंद्रावर शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल, वाचा भरणे काय म्हणाले?
-बारामती मतदारसंघातून मतदान करताना ईव्हीएमवर ‘कमळ’ चिन्ह नाही म्हणून आजोबा आक्रमक
-‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांवर रेणुका शहाणे आक्रमक; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत