पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये पिंपरी मतदारसंघावरुन मोठा तिढा निर्माण होणार असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. अण्णा बनसोडे हे येथील विद्यमान आमदार आहेत. मात्र, भाजपचे स्थानिक नेते अमित गोरखे हे देखील या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. यावरुन महायुतीत पेच होण्या आधीच महायुतीने त्यावर उपाय शोधला अन् भाजपने अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर आता आण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मला अनेक पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे ही फोन येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे माझं ठरलेलं आहे, असं वक्तव्य अण्णा बनसोडेंनी केले आहे. अनेकांनी गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने बनसोडेंच्या वाटेतला काटा दूर झाल्याचं बोललं गेलं. यावर देखील अण्णा बनसोडेंनी उत्तर दिले आहे.
“तसे म्हणता येणार नाही. कारण गेल्या दोन वर्षांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांचं सरकार आहे. प्रत्येक मतदारसंघात तिथल्या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. आमच्या मतदारसंघात भाजपाचे अमित गोरखे इच्छुक होते. परंतु, आता भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे”, असे अण्णा बनसोडे म्हणाले आहेत.
“प्रत्येक पक्ष त्या त्या मतदारसंघात योग्य उमेदवाराला उमेदवारी देतात. त्यामुळे आता गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. मी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवेन. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार करतील, असा माझा ठाम विश्वास आहे. पिंपरी मतदारसंघात मी गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहे आणि ही अजित पवार गटाची जागा आहे. विधानसभा निवडणुकीत ही जागा अजित पवार गटाला सुटेल यावर माझा ठाम विश्वास आहे”, असेही अण्णा बनसोडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुढची निवडणूक बारामतीतून लढणार’; महादेव जानकरांची मोठी घोषणा
-सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ कॅचवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; ‘त्याने तो कॅच नसता घेतला तर….’
-विधानसभेची तयारी! ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट
-रिक्षा चालकांसाठी आमदार सिद्दार्थ शिरोळेंनी विधानसभेत केली ‘ही’ महत्वाची मागणी