पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते. सर्व पक्ष कंबर कसून काम करताना दिसत आहेत. राज्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं आहे.
“मी आतापर्यंत तुमचं ऐकत आलो आहे. आता तुम्हाला माझ ऐकावं लागेल. माझा शब्द मोडू नये, असं मला वाटतं. पण तो तुमचा अधिकार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केल्याचं आज दिसून आलं. आज अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी बारामतीकरांशी बोलताना त्यांनी भावनिक साद घातल्याचं पहायला मिळालं आहे.
“माझा स्वभाव कडक आहे. पण मी कधी कोणावर दबाव आणला नाही. माझ्या जोडीला खासदार असला की, केंद्र सरकारची कामे करता येतील. आजपर्यंत जशी साथ दिली. तशीच यापुढेही लोकसभेला द्या. बारामतीचा माझ्यासारखा विकास कोणी करू शकत नाही. माझं चिन्ह घड्याळ आहे. जशी जशी निवडणूक येईल तशी तुमच्यावर दबाव येईल, पण मी कोणावर दबाव आणला नाही. आजपर्यंत तुम्ही मला साथ दिली आहे. उद्या लोकसभेला सुद्धा साथ द्या”, असं म्हणत अजित पवारांनी बारामतीकरांना पुन्हा एकदा भावनिक आवाहन केल्याचं पहायला मिळालं आहे.
“उद्याच्या काळात महायुती उमेदवार जाहीर करणार आहे. उमेदवार दिल्यानंतर तुम्ही साथ द्याल ही खात्री आहे. केंद्रामध्ये आपल्या विचारांचा खासदार गेला. तर लोकांची कामं होतील. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंध चांगले आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही बाजूने निधी आला. तर संपूर्ण बारामती मतदारसंघाचा विकास होईल. त्यामुळे महायुती जो उमेदवार देईल. त्याला निवडून द्याल, असा विश्वास आहे”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
“आज किंवा उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेच्या काळात काही नियम पाळावे लागतात. आपल्याला माहिती आहे की आधी लोकसभा निवडणूक असेल. मग विधानसभा असेल. बारामती कशी बदलत गेली. विकास कसा होत गेला. हे आपल्याला माहिती आहे. एमआयडीसीला जागा कमी पडायला लागली आहे. मी सातत्याने कामगार आणि उद्योगपती यांच्यात समन्वय साधत गेलो आहे. आपण मला साथ दिली. वडीलधारी मंडळींनी साथ दिल्याने काम करण्यास हुरूप येतो. कंपनीला फायदा होत असेल कंपनीने देखील कामगारांना साथ दिली पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपकडून मोहोळांना उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
-भाजपने तर डाव टाकला आता काँग्रेस काय खेळी खेळणार; मोहोळांना टक्कर देण्यासाठी कोणाला देणार उमेदवारी?
-आता वेल्हे तालुक्याचं नाव ‘राजगड’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय
-मुरलीधर मोहोळांचा वसंत मोरेंना फोन; भाजपमध्ये जाणार? मोरे म्हणाले, ‘मी माझा निर्णय..’