बारामती : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पवार कुटुंबामध्ये मोठी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका खासदार शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात या लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देत लढवणार आहेत. त्यामुळे आता संपूर्ण राजकीय वर्तुळात पवार कुटुंबामध्ये होणाऱ्या लढतीची चर्चा आहे. शरद पवार यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे.
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या लढतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधील पूर्ण पवार कुटुंब उतरले आहे. आता अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांना चांगलंच सुनावलं आहे. श्रीनिवास पवार हे काटेवाडीमध्ये बोलत होते.
“तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?”, असं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.
“दुसऱ्याकडून लाभ मिळणार म्हणून साथ सोडणं चुकीचं”
“यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही. आपल्याला दुसऱ्या माणसांकडून लाभ मिळणार म्हणून साथ सोडणं चुकीचं आहे. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी आहे,” असं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.
“भाजपला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं होतं”
“साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. ज्यांनी आपल्याला चारवेळा उपमुख्यमंत्री केलं. २५ वर्षे मंत्री केलं अशा काकांना आपण हे विचारतोय? मला जर असा काका मिळाला असता तर मी खुश झालो असतो. ही सगळी भाजपची चाल आहे. भाजपला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं होतं. घरातला व्यक्ती बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो, याच नितीने भाजप वागली आहे” असं म्हणत श्रीनिवास पवार यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली
-‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट
-मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी
-मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मतदान
-मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?