पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा स्पष्टवक्तेपणा कायमच राजकीय चर्चेचा विषय राहिला आहे. आपल्या शाब्दिक बाणांनी त्यांनी आजवर अनेकांचा जाहीर सभेतून समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यात बोलताना “दोन आमदार निवडून येण्याची शक्यता असताना विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे ४० पेक्षा अधिक आमदार कसे काय निवडून येऊ शकतात?” अशी शंका उपस्थित करत राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. हीच टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे.
राज ठाकरे टीका करून मोकळे झाले, परंतु यामुळे दुखावलेल्या अजित पवारांच्या नाराजीचा सामना मनसे नेत्याला करावा लागला आहे. झालं असं की, आज पुणे महापालिकेत अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पुणे शहरातील सर्व माजी नगरसेवक, अधिकारी, शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनसेचे बाबू वागस्कर हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी बोलून अजित पवार शिवाजीनगर पोलीस मुख्यालय ग्राउंडवर आयोजित कार्यक्रमासाठी जायला निघाले, यावेळी त्यांची भेट बाबू वागस्कर यांच्याशी होताच “तुझा नेता (राज ठाकरे) तर जाहीरपणे बोलला की आमच्या पक्षाला एक दोनच जागा मिळायला हव्या होत्या. हे बोलणं बरं नाही….सांगा त्यांना माझ्या भावना…” अशा शब्दात टोमणा लगावत अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनपेक्षितपणे अजितदादांचे तिखटशब्द ऐकावे लागल्याने बाबू वागस्कर हे देखील गोंधळून गेले तर उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरेंसाठी घेतला उदय सामतांशी पंगा, आता शिंदेसेनेत प्रवेशासाठी धडपड सुरू
-‘कॉमेडी शो’च्या नावाखाली अश्लिल भाषा; समय रैनाचा उठला बाजार, नेमकं घडलं काय?
-‘व्हॅलेंटाईन डे’ला चढली झिंग, पुण्यात महिलेचा दारु पिऊन तमाशा; भर रस्त्यात बसली अन्…
-“सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब”; पुण्यात नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी