पुणे : शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटामध्ये प्रवेश करुन शिरुरची उमेदवारी घेणार आणि लोकसभेच्या रिंगणार उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आढळराव पाटील यांची अजित पवारांशी जवळीक वाढल्याचंही अनेकदा दिसून आले आहे.
एका गाडीतून प्रवास अनेक कार्यक्रमांना अजित पवारांसोबत उपस्थिती यामुळे आढळराव पाटील अजित पवार गटात जाण्याच्या चर्चेने जोर धरला. या चर्चेला अजित पवारांचीही मूकसंमती असल्याचे चित्र दिसत होते. मात्र अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी आमदार महेश लांडगे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी करत राजकीय डाव टाकत अप्रत्यक्षपणे आढळराव पाटील यांना विरोध केला.
विलास लांडे यांच्या विरोधामुळेच सोमवारी मंचर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी आढळराव पाटील यांचा नामोल्लेख करणेही टाळल्याने नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार गटातून शिरूर लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार विलास लांडे यांनी आपले राजकीय विरोधक महेश लांडगे यांना शिरूर लोकसेभेची उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली होती.
खरे तर ही मागणी करत त्यांनी अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अप्रत्यक्ष विरोध दर्शविला होता. तसेच भाजपला जागा गेली तर लांडगे आणि अजित पवार गटाला जागा सुटली तर पक्षाशी प्रामाणिक राहिलेलो स्वत: आपण, अशी एक खेळी विलास लांडे यांनी खेळली आहे. त्यामुळे आता लांडे यांच्या या भूमिकेची उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना दखल घ्यावी लागली आहे.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील अनेक नागरिक कामधंद्यासाठी भोसरीत आहेत. विलास लांडे हे महापौर असल्यापासून या नागरिकांच्या संपर्कात आहेत. तसेच महापौर, आमदार आणि व्यावसायिक अशा अनेक भूमिकांमध्ये ते भोसरी आणि आसपासच्या मतदारसंघातील नागरिकांच्या संपर्कात आहेत. त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे महेश लांडगे आणि त्यांच्यातील वादही संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विलास लांडेंच्या भूमिकेची दखल अजित पवारांना घ्यावी लागली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी जवळीकतेची चर्चा रंगात असतानाच लांडे यांच्या खेळीने नवी समीकरणे समोर येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“ज्यांच्या नाकाखालून सहकारी निघून गेले त्यांची बरोबरी मोदी, शहांसोबत काय करणार?”
-“घरात लग्नला विभक्त कुटुंबही एकत्र येत, देशात लोकसभा नावाचं लग्न…”- चंद्रकांत पाटील
-अजितदादा, ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना?; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
-मित्राला खासदार करायचंय! मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’
-हर्षवर्धन पाटलांनी केला धमकीचा आरोप; राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करणार गैरसमज दूर