पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय राडे पहायला मिळत आहेत. अशातच पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पुण्यातील मतदारसंघापैकी वडगाव शेरी सर्वात चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या जागेवर दावे केले जात आहेत. वडगाव शेरीच्या जागेचा प्रश्न सुटण्याआधीच भाजपचे विद्यमान आमदार असणाऱ्या कोथरुड विधानसभेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.
कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढणार हे निश्चित मानलं जात असताना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने आता कोथरुडवरुन महायुतीमध्ये वाद होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष विजय डाकले यांनी कोथरुडची निवडणूक लढणार असल्याचं बोलून दाखवलं आहे.
“मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. परंतु, नंतर माघार घेण्यास सांगितलं. मात्र, यंदा निवडणूक लढवायची याच्यावर आम्ही ठाम आहोत,” असा निर्धार विजय डाकले यांनी व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रही भूमिकेमुळे वडगाव शेरी प्रमाणेच आता कोथरुडमध्ये देखील राष्ट्रवादी-भाजप वाद उभा राहणार असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“जनतेचं ठरलंय! वडगाव शेरीत मशालच…” ठाकरेंच्या शिलेदराचे झळकले बॅनर्स
-सुप्रिया सुळेंचं मिशन पिंपरी-चिंचवड; थेट अजिदादांना डिवचलं, म्हणाल्या ‘आधी शहराचा कारभारी…’
-पर्वतीसाठी बागुलांचा गनिमी कावा, काँग्रेस नेत्यांनंतर थेट शरद पवारांची भेट; नेमकं चाललंय काय?
-पुणे-बेंगळुरू बायपाससाठी ३०० कोटींचा निधी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हिरवा कंदील