पुणे : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं अन् निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. राज्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदासंघामध्ये तिहेरी लढत होण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढण्याची पुर्ण तयारी केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शिवतारे यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीत मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी भाष्य केले आहे.
शिवतारे काय म्हणाले?
“मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना बारामतीतील गणितं समजावून सांगितली, त्यामुळे निश्चितपणे चांगला रिझल्ट येईल. एवढंही सांगितलं की, अजित पवार निवडून येणार नाहीत. मी जरी उमेदवार नसलो तरी अजित पवारांचा पराभव होईल. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बारामतीच्या निवडणुकीवरून आपण युतीधर्म पाळला पाहिजे, आपण महायुतीत आहोत, त्यामुळे युतीधर्म पाळावाच लागेल. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे. त्यांचं जे काही होईल ते आपसात होईल, त्यामध्ये आपण पडायला नको. ज्याच्या त्याच्या कर्माने तो मरेल, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री म्हणाले.”
“गेल्या निवडणुकीवेळी कोण विजय शिवतारे? त्याची लायकी काय? त्याचा आवाका काय? असं अजित पवार म्हणाले होते. मी एवढा लहान आहे, तर मग अजित पवार आता का तडफडताहेत. मुख्यमंत्र्यांना सांगा, उपमुख्यमंत्र्यांना सांगा असं ते का करतात. हा विजय शिवतारे कोण, त्याचा आवाका काय, त्याची लायकी काय हे अजित पवारांना दाखवतोच”, असंही विजय शिवतारे म्हणाले आहेत.
दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पत्नी महायुतीच्या उमेदवार असण्याची मोठी चर्चा आहे. शरद पवार गटाकडून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यातच विजय शिवतारे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं वारंवार सांगत आहेत. त्यानुसार बारामती मतदारसंघात दौरेही करताना दिसत आहेत. आता बारामतीची ही लढत तिहेरी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘हे’ असणार काँग्रेस उमेदवार; चंद्रकांत पाटलांनी थेट नावच सांगितलं
-‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य
-“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान
-काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?