पुणे : पुणे शहरात काही आठवड्यापूर्वी कल्याणीनगरमध्ये हिट अँड रन प्रकरणाची राज्यात चर्चा झाली. त्यानंतर आता पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये एका डंपरने दुचाकीला मागून जबरदस्त टक्कर दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये १ महिला गंभीर जखमी आहे. हा अपघात इतका भीषण आहे की, मृत्यू झालेल्या महिलेचे धड एका बाजूला आणि शीर एका बाजूला पडले आहे.
शहरातील मार्केट यार्डमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगाधाम चौक, बिबवेवाडीमधील फायरब्रिगेड समोर, कोंढव्याकडून गंगाधामकडे येणाऱ्या रोडवर या डंपरने धडक दिली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी (१२ जून) दुपारी साडे बाराच्या सुमारास घडला. या अपघातानंतर डंपर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
अपघात झालेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. या रस्त्यांवर जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही बिनधास्त बांधकाम व्यावसायिकांचे ट्रक, मिक्सर तीव्र उतारावरुन ये-जा करतात. त्यातच वाहतूक पोलिसांकडून याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जाते. कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर राजकारणी आणि लोकप्रतिनिधींकडून पोलिसांवर दबाव टाकला जातो. या अनास्थेने आज एका महिलेचा बळी घेतला.
महत्वाच्या बातम्या-
-पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती मंदावते; काय खावे काय खाऊ नये?
-‘२ दिवस थांबा सगळं सरळ करु’; शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर शरद पवारांचे आश्वासन
-ट्रॅव्हल्समुळे हडपसरमध्ये वाहतूक कोंडी; आमदार तुपे उतरले रस्त्यावर
-‘एकच मुलगी असलेल्या बापाला अनेक गोष्टी…’; शरद पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य