पुणे : लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपने देशभरातील १९५ उमेदवारांची नावे जाहीर करत आघाडी घेतलीय, तर दुसरीकडे मात्र काँग्रेससह इंडिया आघाडीत अजून जागावाटपावरून खलबते सुरू आहेत. यामध्ये पुणे शहरातून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता जेष्ठ नेत्याने हायकमांडला पाठवलेल्या लेटरमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे शहरात काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह २० नेते इच्छुक आहेत. यामध्ये आता उपमहापौर राहिलेले जेष्ठ नेते आबा बागुल यांनी उमेदवारीसाठी दावा केला असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवत शहरातील सध्य परिस्थिती मांडतानाच आपणही इच्छुक असल्याचे म्हंटले आहे. तसेच “जाहीर सभा घेऊन कोणाची किती ताकद पहा, मग उमेदवारीचा निर्णय घ्या, लोकसभेसाठी “यशस्वी कलाकारा”ला (मोठ्या मताधिक्याने पडलेला उमेदवाराला) पुन्हा उमेदवारी दिल्यास निकाल “यशस्वी” लागेल” असे म्हणत आबा बागुल यांचे पक्षातील इच्छुकांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय आहे आबा बागुल यांचे पत्र?
लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहजशक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी मी जाहीर सभा घेतो. या सभेला हजारोच्या संखेने पुणेकर नागरिक उपस्थित राहतील. पुणेकर मतदार सुज्ञ आहेत. ते जो कौल देतील, त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कॉल कुणाला आहे हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा.
मी गेली ४० वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आहे. तब्बल ३० वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहे. प्रभागच काय वॉर्ड रचना बदलूनही सलग सहा वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे. शहर विकासाचे व्हिजन आणि कॉग्रेस पक्षाची ध्येयधोरणे याची मला सदैव जाण असल्यानेच जनतेनेही भरभरून मतदान केलेले आहे. त्यामुळेच सहा टर्म लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी स्वीकारले आहे आणि कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ यावर जनमानसातूनच शिक्कामोर्तब झाले आहे.
मला समाजकारण -राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. मी खात्रीपूर्वक नमूद करतो की, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. त्यासाठी जनमताचाकौल घ्या, जाहीर सभा घेण्यास मला निर्देश दया, मी सक्षम व तयारीत आहे. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल. कृपया आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती. आणि त्यानुसारच ‘कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा’ हे सूत्र लोकसभेसाठी यंदा अवलंबावा ही विनंती. जर तेच ते ‘यशस्वी कलाकार’ ( मोठ्या मताधिक्क्याने पराभूत झालेले) पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे ‘यशस्वीच लागेल.
महत्वाच्या बातम्या-
-जानकर शरद पवारांच्या साथीला?; पवारांनी जानकरांसाठी सोडली माढाची जागा
-आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’
-‘येत्या काळात ठाकरे-मोदी एकत्र येणार’; शहाजी बापू पाटलांनी वर्तवलं भाकित
-पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम; वाहतूक नियमात बदल करुनही ट्रफिकच