पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून पुण्यातील कसबा, पुरंदर आणि भोरमध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कसब्यातील विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनाच काँग्रेसने पुन्हा मैदानात उतरवलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धंगेकरांना काँग्रेसने संधी दिली होती, परंतु पराभवाचा सामना करावा लागला. आपलेच होमग्राउंड असणाऱ्या कसब्यात देखील त्यांना मताधिक्य राखता आले नाही. दुसरीकडे एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? असे म्हणत काँग्रेसमधील इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकावले असून धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने व्यवहारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
ग्रामदेवता कसबा गणपतीचे दर्शन घेत कमाल व्यवहारे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. “गेली सात वर्षांमध्ये पाच पक्ष फिरून आलेल्या व्यक्तीने काँग्रेसवर ताबा मिळवला असून पक्षांमध्ये आता प्रामाणिक असणाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. गेली 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत असताना विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. 2009 पासून आजतागायत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असताना देखील पक्षाने विचार केला नाही. त्यामुळे आता माझ्या समोर पर्याय नसल्याने काँग्रेस पक्षातून बाहेर पडत आहे” असं कमल व्यवहारे म्हणाल्या आहेत.
मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत असते. आयुष्यात कधी मी गटबाजी केली नाही. पक्ष वाढवण्याचे काम केलेलं आहे. पक्ष संघटनेला झोकून देऊन काम केलं आणि हे काम करत असताना 2009 झाले 2014 आणि आता यावेळीही असे जर तुम्ही मला नेहमी डावलत असाल तर ही कुठेतरी माझ्या स्वतःसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण काहीच नाही का? असं जर पक्षाला वाटत असेल मला काहीतरी निर्णय घेणे भाग आहे, असे म्हणत असताना कमल व्यवहारे यांना अश्रू अनावर झाले होते.
‘मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत असताना माझा विचार केला गेला नाही. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेताना मला खूप वेदना होत आहेत. पण राजकारणात भावनांना किंमत नसते. माझ्या कसबा मतदारसंघातील माझ्या लोकांनी मला सांगितलं की ही अन्याय आहे. आणि त्या सर्वांसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. आता पक्षाने समजूत घातली तरीही मी या पक्षात थांबू शकत नाही. मी येत्या शनिवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मी अपक्ष निवडणूक लढणार आहे. कोणत्याही पक्षात जाणार नाही’, असे कमल व्यवहारे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्या भिडणार
-२०१९ ला संधी हुकली पण शरद पवारांनी यंदा दिली ताकद, प्रशांत जगताप हडपसरच्या मैदानात
-Assembly Election: चिंचवडमध्ये जगतापांची प्रचाराला सुरवात; आघाडीतून कोण टक्कर देणार?