पुणे : ऐकावं ते नवलंच, पुण्यात दारु पिणाऱ्या मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यासाठी एक रुग्णवाहिका आली. त्यावेळी त्याच्या दोन मित्रांनी त्याला घेऊन जाऊ नये म्हणून गोळीबार केला आमि रुग्णवाहिकेच्या काचाही फोडल्या. हा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दारु पिणारा व्यक्ती तसेच त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप हरगुडे याच्या कुटुंबियाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. हरगुडे कुटुंबाच्या सांगण्यावरुन गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पुण्यातील जागृती व्यसनमुक्ती केंद्रातून संदीपला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आली. त्यावेळी संदीपने आपल्या दोन मित्रांना ‘हे मला घेऊन जात आहे, यांना सोडू नको’ असं म्हणत दारुच्या नशेत आरडाओरडा केला. त्यावेळी त्याच्या नशेत असणाऱ्या मित्रांना संदीपला ओढत नेत असल्याचे पाहून परवाना असलेल्या बंदूकीतून हवेत गोळीबार केला.
या प्रकरणी संदीपचे मित्र विशाल कोलते आणि अमोल हरगुडे यांनी दहशत माजवण्यासाठी थेट रूग्णवाहिका फोडली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. विशाल रामदास कोलते (वय ३२, रा. बकोरी, ता. हवेली), संदीप कैलास हरगुडे (वय ४२) आणि अमोल राजाराम हरगुडे (वय ३६, दोघे रा. केसनंद, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याबाबत रुग्णवाहिका चालक सुधाकर अरुण कानडे (वय ३५, रा. कात्रज ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले तसेच रिवॉल्व्हर जप्त केली आहे.