पुणे: शहरात सुरु असणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पावसामुळे रत्यावर जागोजागी झालेले खड्डे यामध्ये भर घालत आहेत. नागरिकांकडून राज्यकर्ते आणि महापालिके विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी बोलताना शहरात रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने ठेकेदारांनी रस्त्यांची जबाबदारी घ्यायला हवी. जो कोणी घेणार नाही त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
पुणे महापालिका हद्दीत पंधरा वार्ड ऑफिस असून या प्रत्येक वॉर्ड ऑफिसला प्रत्येकी दोन अशा ३० टीम तयार करुन खड्डे बुजविणे आणि वाहतूक नियोजन करा, महापालिका आणि पोलिसांनी एकत्र काम करावे, येत्या काही दिवसांत शहरात एकही खड्डा राहाता कामा नये, असा दमही मोहोळ यांनी महापालिका प्रशासनला भरला. त्यावर पुढील ४-५ दिवसांस खड्डे बुजविण्याची कार्यवाही करु, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे. बैठकीला आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एकत्रिक बैठक घेतली. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने यांच्यासह मा. नगरसेवक उपस्थित होते.
‘ठेकेदारांनी रस्त्यांची जबाबदारी घ्यायला हवी. पण जो कोणी घेत नसेल, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. शिवाय कामात हयगय करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका. आम्हाला पुण्यातील रस्ते आणि वाहतूक सुरुळीत झालेली पाहिजे, असेही निर्देश दिल्याचे मोहोळ म्हणाले. शिवाय महापालिका आणि जलसंपदा यात समन्वय कसा राहील? याची काळजी आम्ही घेत आहे, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.