पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुण्यात आज शिवसंकल्प मेळावा झाला. या मेळव्यामध्ये बोलताना शिवसेनेच्या नेत्यांनी पुण्यातील अनेक जागांवर लढणार असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ म्हणजे हडपसर आणि वडगावशेरी विधानसभेच्या जागांवर दावा केल्याने महाविकास आघाडीत शीतयुद्धाला सुरवात झाल्याचे पहायला मिळत आहे.
शिवसेनेकडून आज पुण्यात येऊन ८ पैकी ४ ते ५ मतदारसंघांवर दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या मेळाव्यानंतर प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना हडपसर आणि वडगावशेरीची जागा सोडण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणत ठाकरे सेनेच्या दावा फेटाळला आहे.
काय म्हणाले प्रशांत जगताप?
‘पहिल्या २ ते ३ प्राथमिक बैठका झाल्या त्यामध्ये पुण्यातून शिवसेनेला जागा निश्चित सुटतील. ठाकरे सेनेला २०१४ साली आणि २०१९ सालच्या निकालानुसार पुढे जावे लागणार आहे. यामध्ये हडपसर, वडगावशेरी, खडकवासला, पर्वती या जागा काल आज आणि उद्या सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
खासदार संजय राऊत ‘एकला चलो’चा भूमिकेतून वक्तव्य केली. त्यावर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, ‘कदाचित शिंदेंच्या शिवसेनेला आणि फडणवीसांना आपलं सामर्थ्य दाखवायचं असेल त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्ये केली असतील. प्रत्येक पक्ष २८८ जागा लढू शकतो. पण शरद पवारांची राष्ट्रवादी मनात किलमीश न ठेवता भाजपला दूर ठेवून पुढे आलो आहोत, तसेच इतर पक्षांनीही मनात कोणतेही किलमीश ठेऊ नये. भाजपला फायदा होईल अशी वक्तव्ये करु नयेत’, असे आवाहनही शिवसेनेला केले आहे.
‘महायुतीला सत्तेपासून दूर करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता ठेवणं गरजेचं आहे हे संजय राऊतांना माहिती आहे. हडपसरची जागा निश्चितच शरद पवार गटाकडे राहिल. निवडणुका लढण्यासाठी फार काही गांभिर्य लागत नाही, गांभिर्य लागतं ते जिंकण्यासाठी. मुंबई, दिल्ली स्तरावर ३ बैठका झाल्या आहेत. महाविकास आघाडीला कोणत्या जागा कोणाला सोडायच्या हे शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येऊन ठरवतील’, असेही प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपचे कार्यकर्ते करणार वाहतूक पोलिसांना मदत; शहराध्यक्ष धीरज घाटेंची माहिती
-१५ दिवसांत शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
-‘ढेकणाला आव्हान द्यायचं नसतं, त्यांना…’; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिली ढेकणाची उपमा
-मावळात महायुतीत संघर्ष अटळ: भाजपच्या बाळा भेगडेंची बंडखोरी, भर सभेत म्हणाले,…