पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. पुणे शहरामध्ये विधानसभेचे ८ मतदारसंघ आहेत. त्यापैकी एक असलेल्या हडपसरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार चेतन तुपे हे आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरुर लोकसभेचा भाग आहे. या जागेवरवरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या जागेवरुन वाद होऊ नये म्हणून भाजपने आधीच विधानसभेची तयारी करत असणाऱ्या योगेश टिळेकर यांना विधान परिषदेत पाठवले आहे. त्यामुळे भाजपकडून हा प्रश्न मिटला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून हडपसर विधानसभेच्या उमेदवारीसाठी लढाई सुरु आहे.
इतिहास हडपसर विधानसभा मतदारसंघाचा
२००९ साली झालेल्या हडपसर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या महादेव बाबर यांनी ६५,५१७ मते मिळवत विजय मिळवला होता. यावेळी महादेव बाबर, मनसेकडून वसंत मोरे आणि काँग्रेसकडून बाळासाहेब शिवरकर यांच्यात लढत झाली. महादेव बाबर यांनी १० हजारांचं लीड घेत विजय मिळवला. त्यानंतर मात्र मोदी लाटेमध्ये २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या योगेश टिळेकर यांनी ८२,६२९ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला.
२०१९मध्ये भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मोदी लाट कायम असताना योगेळ टिळेकर यांना हडपसरची जागा राखता आली नाही. आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी ९२,३२६ मते मिळवत टिळेकरांना पराभूत केले.
हडपसरमधून महायुतीकडून कोण इच्छुक?
भाजपने योगेश टिळेकरांना विधान परिषदेमध्ये पाठवून महायुतीतील हडपसरच्या जागेवरील तिढा काहीसा कमी केला आहे. मात्र, या जागेसाठी शिंदेच्या सेनेकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहे. शिंदेच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे हे हे हडपसरमधून निवडणूक लढण्यासाठी आग्रही असून दोघांकडूनही तयारी सुरु आहे.
हडपसरमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित प्रश्न असून अद्यापही हे प्रश्न सुटलेले नाहीत. हडपसर भागातील फुरसुंगी येथील कचरा डेपो, दैनंदिन होणारी वाहतूक कोंडी, तसेच या भागात नेहमीचा आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा…तोही अद्याप कायम आहे. लोकसभा निवडणुकीत हडपसरमध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना चांगले मतदान मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास शरद पवार गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी लढण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेकडून हडपसर विधानसभेच्या निवडणुकीसाठी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
हडपसरमधून महाविकास आघाडीकडून कोण इच्छुक?
आगामी विधानसभा निवडणुकीत हडपसरमधून निवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडमध्येही रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार महादेव बाबर, नुकतेच पक्षात प्रवेश केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे हडपसरमधून लढण्यास इच्छुक आहेत.
काँग्रेसकडून चंद्रकांत शिवरकर हे हडपसरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून हडपसरमध्ये लढण्याची तयारी करत आहेत. जगताप यांच्या उमेदवारीला पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ग्रीन सिग्नल दिला असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’
-महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…
-Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?
-लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीत संमतीशिवाय फोटो वापरला; महिलेची पुण्यातील भाजप आमदाराविरोधात तक्रार