पुणे : महाराष्ट्र सरकारकडून मोठा गाजावाजा करत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून योजनेच्या प्रसिद्धीसाठी आपल्या भागामध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. याच प्रकारचे बॅनर शिवाजीनगर मतदारसंघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून लावण्यात आले. मात्र बॅनरवर परवानगी न घेता आपला फोटो छापल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांत केली आहे. यावर आता सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून स्पष्टीकरण देत “ज्या फोटोग्राफरने हे फोटो काढले त्याची परवानगी घेऊनच बॅनरवर छापले” असं सांगण्यात आलं आहे.
याबद्दल बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले ” राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्यासाठी शिवाजीनगर मतदारसंघात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. जाहिरात बनवण्यासाठी काम देण्यात आलेल्या एजन्सीने परवानगी घेऊन व रीतसर पैसे भरून हे फोटो वापरले आहेत. 2016 साली ज्या फोटोग्राफरने हा फोटो काढला होता त्याची परवानगी घेऊनच जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून फोटो वापरण्यात आले. तरीदेखील फोटो वापरल्याने महिलांना वेदना झाल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”
दरम्यान, “तक्रारदार महिला पुण्यामध्ये राहणाऱ्या नाहीत, जर एखाद्या व्यक्तीने त्यांना हा फोटो कसा लावला गेला? अशी तक्रार देण्यासाठी सांगितल असेल तर त्यांचा हेतू पोलिसांनी तपासून योग्य ती कारवाई करावी”, असे देखील सिद्धार्थ शिरोळे म्हणाले आहेत. एक प्रकारे संबंधित तक्रारदार महिला या पुण्यातील नसताना शिरोळे यांच्या फ्लेक्सवरून तक्रार दाखल करण्यासाठी आल्या, हे कोणीतरी राजकीय हेतूने सांगितलं असावं? अशी शंकाच अप्रत्यक्षपणे शिरोळे यांनी व्यक्त केल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?
-लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीत संमतीशिवाय फोटो वापरला; महिलेची पुण्यातील भाजप आमदाराविरोधात तक्रार
-अजित पवार शरद पवारांसोबत जाणार?; कार्यकर्ते म्हणाले, ‘दादांना पक्षात घेतले तर…’