पुणे : विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी एक असलेल्या खडकवासलामध्ये भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत. गेली तीन टर्मपासून आमदार असलेल्या तापकीर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार दिला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे राहणार की मित्रपक्ष शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना येथून मताधिक्य मिळाले असले, तरी अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये भाजप उमेदवारांना चांगली कामगिरी करता आली होती. त्यामुळे यंदा महायुतीतून लढलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण मदार खडकवासला मतदारसंघावर होती. परंतु अपेक्षेप्रमाणे येथे मताधिक्य मिळाले नाही. ही गोष्ट विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्यासाठी देखील धोक्याची घंटा ठरत आहे. या परिस्थितीमध्ये भाजप पुन्हा तापकीर यांना उमेदवारी देणार का? हा प्रश्न कायम आहे. भाजपमध्ये देखील इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
खडकवासला मतदारसंघाचा इतिहास
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश वांजळे हे येथून विजयी झाले होते. २०११ साली रमेश वांजळे यांचे अकाली निधन झाल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या भीमराव तापकीर यांनी विजय मिळवला. पुढे २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपचे भीमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बराटे, मनसेचे राजाराम लायगुडे, शिवसेनेचे शाम देशपांडे आणि काँग्रेसचे श्रीरंग चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली. मोदी लाटेत भाजपच्या तापकीर यांनी १,११,५३१ मते मिळवत दणदणीत विजय साकार केला.
२०१९ मध्ये पुन्हा भाजपचे भीमराव तापकीर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि १,२०,५१८ मते मिळवत विजयी झाले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांचा निसटता पराभव झाला.
खडकवासलात महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या वाढली
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या अनेकांची नावे समोर येऊ लागली आहेत. भाजपकडून खडकवासल्याची निवडणूक लढण्यासाठी सध्या विद्यमान आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, हरिदास चरवड हे इच्छुक आहेत. तसेच ऐनवेळी आणखी नावे पुढे येऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खडकवासला मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, माजी उपमहापौर दिलीप बराटे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयूरेश वांजळे हे इच्छुक आहेत.
शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे, युवा सेनेचे निलेश गिरमे हे देखील खडकवासल्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या सर्व इच्छुक उमेदवारांपैकी महायुती कोणाला निवडणूक लढण्याची संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार शरद पवारांसोबत जाणार?; कार्यकर्ते म्हणाले, ‘दादांना पक्षात घेतले तर…’
“…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकला होता”; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप