पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अतुल बेनके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार असल्याची अशी चर्चा सुरु झाली. यावर आता अतुल बेनके यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
काय म्हणाले अतुल बेनके?
विधानसभेच्या निवडणुकीला आणखी दीड-दोन महिने वेळ आहे. या निवडणुकीला सामोरं जाताना काहीही होऊ शकतं त्यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही. कदाचित महायुतीसोबत जात असताना जागावाटपावरुन काही होऊ शकतं. असे भाकीत अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.
“पक्षप्रवेशाबाबत शरद पवार काही बोलले नाहीत. मीही त्यांना काहीही बोललो नाही. पक्षांतराचा प्रश्नच नाही. भविष्यात काहीही होऊ शकतं. कदाचित शरद पवार, अजित पवार एकत्रही येऊ शकतील. भविष्यातील राजकारणाबाबत सध्यातरी काहीही सांगता येत नाही. मी घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. पण भविष्यात स्थित्यंतरे घडली तर मी काही सांगू शकत नाही,” असेही अतुल बेनके म्हणाले आहेत.
“मी आणि अमोल कोल्हे मित्र आहोत. कायम मित्र म्हणून राहू त्यामुळे याचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असं मला वाटतं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या ४० वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरे झाली. ६ महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत करेन,” असेही अतुल बेनके स्पष्टपणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा खेडकरांची जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात छळाची तक्रार; सुहास दिवसे म्हणाले,…
-विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मिळाला बुस्टर; निवडणूक आयोगाने ‘ती’ मागणी केली मान्य