पुणे : राज्यभरात सध्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची तुफान चर्चा सुरु आहे. सध्या पूजा खेडकर आणि संपूर्ण खेडकर कुटुंबाचे कारनामे उघड झाले आहेत. त्यावरुन पुणे पोलिसांनी आणि पुणे महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशीतील शेतकऱ्यांना हातात पिस्तुल घेऊन दमदाटी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पूजा खेडकरचा आई मनोरमा खेडकरचा २ दिवसांपूर्वी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांवर दमदाटी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयीवर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्या आईवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे शहर पोलीसांनी मनोरमा खेडकरला नोटीस बजावली आहे.
मनोरमा खेडकर यांच्याकडे पिस्तूलचा अधिकृत परवाना असल्यामुळे पिस्तुलाचा परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मनोरमा खेडकर विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानं पिस्तूलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मनोरमा खेडकरच्या घरी पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे शहर पोलीसांची पथकं पोहचली. त्यांनी पिस्तूलासंबधीची नोटीस घराबाहेर भिंतीवरती लावली आहे.
‘तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवाना विषयक अटी आणि शर्तींचा भंग केला आहे. त्यामुळे तुम्ही शस्त्र परवाना धारण करण्यास योग्य व्यक्ती नाही. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये? याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून येत्या १० दिवसांत लेखी स्वरुपात आपले म्हणणे मांडावे, तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल? अशा आशयाचा मजकूर असलेली नोटीस मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याच्या भिंतीवर पुणे पोलिसांनी लावली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-श्री स्वामी समर्थ: स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना आज काय उपदेश दिले आहेत? वाचा…
-IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढल्या; आई मनोरमा खेडकरांना पालिकेने बजावली नोटीस