पुणे : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. पुणे लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा १ लाख २३ हजारांच्या मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली. लोकसभेतील विजयासह केंद्रात मंत्री पदाची लॉटरी देखील लागली. मोहोळ यांच्या यशामध्ये पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभेच्या भाजपच्या ज्या स्थानिक नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद लावत मोहोळांना मताधिक्य मिळवून दिले, त्यांनी आता विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
मोहोळ यांना कोथरूड, कसबा आणि पर्वती मतदार संघांमध्ये चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे येथील नेत्यांच्या उमेदवारीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कसबा मतदारसंघात निवडणूक प्रमुख हेमंत रासने तर पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा समन्वयक म्हणून धूरा सांभाळलेले पालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याच दिसत आहे.
भिमाले यांनी पर्वती मतदार संघामध्ये मोहोळ यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले, या फ्लेक्स वर त्यांच्या फोटोमध्ये विधानसभेचा देखील फोटो छापण्यात आला होता. आता सोशल मिडियावर “भावी आमदार श्रीनाथ भाऊ भिमाले.. लढणार आणि जिंकणारच” अशा प्रकारचे ‘रील्स’ कार्यकर्त्यांकडून व्हायरल केले जात आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना तब्बल 29 हजारांचे मताधिक्य मिळाले. या मतदार संघात भाजपच्या माधुरी मिसाळ विद्यमान आमदार आहेत. परंतु, भिमाले यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभेची तयारी केल्याचे आणि मतदारसंघ बांधणीचे काम सुरू केले आहे.
श्रीनाथ भिमाले यांची राजकीय कारकीर्द
भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून २००२ पासून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. शिवाय २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही सांभाळली आहे. पुणे लोकसभेंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणून भिमाले यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला महिन्याला…’; मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंवर प्रत्युत्तर
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’बाबत देवेंद्र फडणवीसांचे महिलांना आवाहन; म्हणाले, ‘एजंटच्या…’
-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यासाठी सभापतींना दिलगिरीचं पत्र; निर्णय कधी?