पुणे : विधान परिषदेमध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. विधान परिषदेतील शिवीगाळीबाबत अंबादास दानवेंनी पत्राच्या माध्यामातून दिलगिरी व्यक्त केली आहे. या पत्रानंतर अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजता सभागृहात दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार होता पण दानवेंवरील कारवाई मागे घेण्याबाबतचा निर्णय आता उद्याच होणार आहे.
“मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु दिनांक १ जुलै रोजी (सोमवारी) माझ्याकडून अनावधनाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे. त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही”
सभागृहाचे कामकाज सुरु आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता- भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणींचे प्रश्न सोडविण्यापासून मला थांबविणे असे होवू नये, या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, ही विनंती, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.
“माझा आवाज दाबणं म्हणजे जनतेचा आवाज दाबणं आहे. माझ्यावर सभापतींनी कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक काही बोलणार नाही”, असे अंबादास दानवे म्हणाले. तसेच निलंबन मागे घेतल्यानंतर त्यावर बोलणे योग्य असेल, असे म्हणत दानवे यांनी या विषयावर जास्त प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चा मुस्लिम महिलांना फायदा देऊ नये’; मनसेच्या ‘या’ नेत्याची मागणी