पुणे : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून आज भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. बीड लोकसभेला पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने संधी दिली आहे. मुंडे यांच्या सोबतीने हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवडचे अमित गोरखे, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, डॉ परिणय फुके यांना भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. योगेश टिळेकर यांच्या उमेदवारीमुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीत निर्माण झालेला तिढा काहीसा सुटला आहे. मात्र विधानसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिलेदारांमध्ये चुरस वाढणार हे नक्की.
हडपसर विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. तर भाजपकडून योगेश टिळेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये आता योगेश टिळेकर यांना विधान परिषदेची संधी मिळाल्याने त्यांचे ‘घोडे गंगेत न्हालं’ आहे. दुसरीकडे चेतन तुपे आणि नाना भानगिरे यांच्यामध्ये येथून उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजपसह महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली. लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने महायुतीने विधानसभेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलीय. विधानसभा निवडणुक महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार तिन्ही पक्षाच्या प्रमुखांकडून व्यक्त केला जातोय. परंतु अनेक मतदारसंघांमध्ये तिन्ही पक्षाचे नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. हडपसरमध्ये देखील हेच चित्र दिसून येत आहे. मात्र आता योगेश टिळेकर यांना विधान परिषदेचे संधी मिळाल्याने भाजप आपला दावा सोडणार का? तो सोडल्यास अजितदादांच्या चेतन तुपेंना की एकनाथ शिंदेंच्या प्रमोद भानगिरेंना संधी? हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; योगेश टिळेकरांसह आणखी ४ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब
-संभाजी भिडेंचं ‘ते’ व्यक्तव्य अन् गिरीश महाजनांनी जोडले कोपऱ्यापासून हात, नेमकं काय घडलं?
-विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; २० जखमी, नेमका काय प्रकार?
-काकांचा पुतण्याला धक्का; पुण्यातील नगरसेवक करणार ‘शरद पवार गटा’त प्रवेश