पुणे : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभेची निवडणूक अवघे चार महिन्यांवर येऊन ठेपल्याने सत्ताधारी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात देखील झाली आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दावा करण्यात येत आहे. खडकवासल्यातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला मिळायलाच हवा, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वागळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत तापकीर यांनी विजय मिळवला. २०१४ आणि २०१९ साली असे लागोपाठ तीन वेळा तापकीर आमदार आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहामुळे २००९ सालापासून शिवसेना-भाजप युतीत खडकवासला मतदारसंघ भाजपकडे राहिला आहे. परंतु शिवसेनेने वेळोवेळी आपला दावा देखील कायम ठेवला. आता शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा खडकवासला मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे महायुतीत या जागेवरून रस्सीखेच होणार हे निश्चित आहे.
रमेश कोंडे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून खेड शिवापूर गावच्या सरपंच पदापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मतदारसंघात शिवसेना बळकट करण्यासाठी त्यांनी आजवर काम केलेल आहे. २०१४ आणि २०१९ साली देखील कोंडे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोंडे यांनी कोट्यावधींचा निधी मतदार संघात आणला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाचा आनंद होणार द्वीगुणीत, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार!
-‘अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम
-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा साधेपणा; सुरक्षा जवानांना ‘सॅल्यूट’ला नकार