पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये खून, चोरी, दरोडा, हल्ला, अपघात, दहशत माजवणे, कोयता गँग, बलात्कार, आत्महत्या असे अनेक प्रकार दररोज नव्याने समोर येत आहेत. त्यातच शहरामध्ये मार्च महिन्यात देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा एकदा शहरात ड्रग्जपार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकरणांमुळे पुणे शहराची मोठी बदनामी होत आहे.
शहरातील ड्रग्ज प्रकरणावरुन काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. त्यानंतर आता भाजप नेते आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. “मी पालकमंत्री असताना अशा प्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत. अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करता येत नाही ना?” असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत।चंद्रकांत पाटलांचा अप्रत्यक्ष रोख हा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
“पुण्याची लोकसंख्या आधी १४ लाख होती. आता ७० लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण, रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, एफसी रोडवरील नामांकित हॉटेल लिक्विड, लेजर, लाऊंजमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली आहे. आता पर्यंत ८ जणांवर कारवाई झाली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणावरुन पुन्हा एकदा सत्ताधारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत; या प्रकरणात महिला अन् परदेशी नागरिकांचाही समावेश
-Pune Drugs Party: ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित