ओबीसी आरक्षणाच्या बचावाचा नारा देत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. गेल्या ७ दिवसांपासून हाके यांचे उपोषण सुरू असून मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचे लेक्षी आश्वासन सरकारने राज्यपाल यांच्या सहीने देण्याची मागणी करण्यात येत आहे. आज उपोषणाच्या सातव्या दिवशी दोन्ही आंदोलकांची प्रकृती कमालीची ढासळली असून हाके यांचे वजन ८ किलोने कमी झाले असून ब्लडप्रेशर धोकादायक पातळीवर पोहचले आहे.
हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून त्यांनी अन्न व पाणी देखील त्यागले असल्याने तब्येत खालावली आहे. डॉक्टर दैनंदिन तपासणी करत आहेत. मात्र आज सकाळी डॉक्टरांनी हाके यांची तपासणी केली असता हाकेंनी उपचार घेतले नाहीत तर ब्रेनहॅमरेज होऊन जीविताला धोका देखील होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचं हाके यांनी म्हटल आहे. गेली सात दिवसांपासून उपोषण सुरू असताना देखील सरकारकडून कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. जालन्यातील अंबड तालुका बंदची हात दिले असतानाच अनेक भागांमध्ये रस्तारोको देखील करण्यात येत आहे.