पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले मिळाले नाही. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत ३० जागांवर यश मिळवल्याने भाजपसह महायुतीतील मित्र पक्षांची मोठी पिछेहाट झाली. लोकसभा निकालानंतर आता भाजपमध्ये पराभवाची कारणीमांसा केली जात आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. आज पुण्यातील संघ कार्यालय असलेल्या मोतीबागेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या जय-पराजयाचा आढावा घेतला जात आहे.
पुण्यातील शनिवार पेठेत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग या कार्यालयामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांमधील नेत्यांना बोलवण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दिंडोरीच्या भारती पवार, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे यांच्यासह भाजपमधील इतर प्रमुख नेते बैठकीला उपस्थित आहेत.
2019 साली भाजप-शिवसेना महायुतीने 48 पैकी 41 मतदार संघांमध्ये विजय मिळवला होता. यामध्ये भाजप 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश आल. परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला, पक्षाच्या खासदारांची संख्या 23 वरून थेट 9 वर पोहचली. महायुतीत असलेल्या शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला देखील समाधानकारक कामगिरी करता आली नाही. हे चित्र विधानसभेला कायम राहिल्यास भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागू शकते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या भाजप पक्षीय संघटनेसह मातृसंस्था असलेल्या आरएसएसने देखील व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यातील मोती बागेमध्ये बोलवण्यात आलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या चिंतनासोबत, आगामी विधानसभेच्या दृष्टीने चर्चा केली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार गटाचे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक; मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?
-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक; असा ठरला जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; आंब्यांच्या पेट्यांमधून विदेशी मद्य जप्त
-शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात हव्यात ३ जागा, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ मतदारसंघांवर दावा
-‘असा विजय काय कामाचा जो…?.’; सुषमा अंधारेंचा रवींद्र वायकरांना सवाल