पुणे: नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याने नर्सरीपासून ते महाविद्यालयांपर्यंत आपल्या मुलांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांची लगभग दिसून येत आहे. यंदापासून मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. एक जून पासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल, अशी घोषणा पाटील यांनी केली. परंतु जून महिना अर्धा उलटला तरीही अंमलबजावणी अद्यापही न झाल्याने चर्चेला उधाण आल आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती पुढे आली असून राज्यामध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू असल्याने निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. आचारसंहिता संपताच हा निर्णय लागू केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
गेल्यावर्षी परभणीमध्ये एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली होती. ही घटना पुढे आल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेत मुलींना मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली. चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थिनींना शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे या निर्णयाचे अंमलबजावणी केव्हा होणार? असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जातोय. या निर्णयाची घोषणा करण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली, तर लगोलग राज्यामध्ये पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक घोषित झाली. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास बंधने आल्याने मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय अद्याप लागू होऊ शकलेला नाही. आचारसंहिता शिथिल होताच हा निर्णय लागू केला जाणार आहे.
मुलींना मोफत शिक्षणाच्या निर्णयानुसार शैक्षणिक शुल्कामध्ये सूट दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थिनींना याचा लाभ मिळेल. विद्यार्थिनींसाठी महत्त्वाचा असणारा हा निर्णय लागू झाल्यानंतर शिक्षणातील मुलींचा टक्का वाढण्यासाठी मदत होऊ शकते.