पुणे : लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी काल नवी दिल्लीमध्ये पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी यांच्या सोबतीने जवळपास ६८ मंत्र्यांचा शपथविधी देखील यावेळी पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ खासदारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद न दिल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. यामध्ये आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार करत केंद्रात मंत्रीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन पुण्यातील नारायण पेठ येथील पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्वानुमते एक ठराव मांडण्यात आला.
या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष यंदा बारामतीतील हायव्होल्टेज लढाईकडे लागले होते. इतिहासात पहिल्यांदाच येथे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. एका बाजूला महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली. सुप्रिया सुळे यांनी एक लाखाहून अधिक मतं घेत सुनेत्रा पवारांचा पराभव केला. हा पराभव अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही हा पराभव पचवणे जड गेले. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख असलेल्या अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेण्याची मागणी केली.
महत्वाच्या बातम्या-
-‘मैं दुसरों के घर मे क्यू झांकू’; सुप्रिया सुळेंचा निशाणा कोणाकडे?
-फेलोशिपसाठी मराठी विद्यार्थ्यांचा लढा; ‘सारथी’ पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून कार्यालयासमोर आंदोलन
-एनडीएमधील धूसफूस चव्हाट्यावर; मंत्रिमंडळ विस्तारावर श्रीरंग बारणे काय म्हणाले?
-केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यात अजित पवार गटाने केली ‘ही’ मोठी मागणी
-‘वादा तोच दादा नवा’! बारामतीत नव्या दादाची एन्ट्री; सर्वत्र झळकले पोस्टर्स